मोबाईलसह रोख रक्कम लुटणाऱ्या दोघांना पालघर पोलिसांनी पकडले; मुंबईतील गुन्हेगारी कनेक्शन उघड
पालघरच्या केळवा रोड परिसरात चाकूचा धाक दाखवून 40 हजारांचा मुद्देमाल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली. मोबाईल व रोख रक्कम जप्त
पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज: केळवा रोड परिसरात रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना पालघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींचा मुंबई परिसरातील चोरी व फसवणुकीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनुज कुमार श्रवण राय (वय १८), रा. केळवा रोड, धोंडालपाडा, ता.जि.पालघर हे केळवा रोड येथील धोंडालपाडा रस्त्याने पायी घरी जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे ३८ हजार रुपये किमतीचा iQOO Neo 10R मोबाईल फोन आणि खिशातील २ हजार रुपये रोख, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.

या घटनेप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याचे तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मोहम्मद अनस मोहम्मद अमजद अन्सारी (वय ३२, रा. भायखळा, मुंबई) आणि मेहेफुज अली अन्सारी (वय ३८, रा. भायखळा, मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेतली असता, त्यांच्याविरुद्ध मुंबई व नवी मुंबई परिसरातील दादर,वाशी,घाटकोपर आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व फसवणुकीसंदर्भात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सपोनि/दत्ता शेळके करीत आहेत.
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि पालघर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि/दत्ता शेळके तसेच पोलीस अंमलदार महेंद्र शर्मा, कैलास शेळके, कल्पेश केणी आणि रामदास ठाणगे यांनी सहभाग घेतला.











Add Comment