मंगळवेढ्यात कार बंद पडताच चौघांचा हल्ला; चाकू-लोखंडी रॉडचा धाक दाखवून १.०४ लाखांचा ऐवज लुटला
मंगळवेढ्यात एनएच-१६६ वर कार बंद पडताच चौघांनी चाकू-लोखंडी रॉडचा धाक दाखवून जबरी चोरी केली. सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.०४ लाखांचा ऐवज लंपास; दोघांना दुखापत
NH-166 वर रात्री थरार स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांची कुटुंबावर झडप; सोन्याचे दागिने, रोकड लंपास
Crime News : मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यात एनएच-१६६ महामार्गावर कार बंद पडल्याचा फायदा घेत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या अनोळखी आरोपींनी चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. झटापटीत फिर्यादी आणि त्यांच्या आईला दुखापत झाली.
कार बंद पडली अन् स्कॉर्पिओ थांबली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भिमराव जावीर वय २९,रा. मरवडे,ता.मंगळवेढा हे ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता आई- वडिलांसह कारने सांगोला- मंगळवेढा मार्गावरून मरवडेकडे जात होते. कचरेवाडी परिसरातील लक्ष्मी नाष्टा सेंटरसमोरील बोगदा फाट्याजवळ त्यांची कार अचानक बंद पडली.
याचवेळी पाठीमागून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. त्यातून तीन अनोळखी व्यक्ती खाली उतरल्या. त्यांनी चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत जावीर कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

झटापटीत आईसह मुलाला दुखापत
जबरी चोरीदरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या आईने प्रतिकार केल्याने झटापट झाली. या झटापटीत दोघांना दुखापत झाली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना प्रकार लक्षात आल्यानंतर ते घटनास्थळी येऊ लागले. त्यानंतर स्कॉर्पिओमधील तीन आरोपी पळून गेले, तर वाहनचालक स्कॉर्पिओ घेऊन सोलापूरच्या दिशेने पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
या घटनेत ७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन शिंपले व सोन्याचे मणी, तसेच ७ ग्रॅम वजनाचे दोन कर्णफुले-झुबे आणि ४ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १,०४,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०९(४), ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सध्या कोणताही मुद्देमाल हस्तगत झालेला नाही.
चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा
या प्रकरणात तीन अनोळखी व्यक्ती आणि स्कॉर्पिओ चालक अशा एकूण चार अनोळखी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने सपोनि कुमार ढेरे करीत आहेत.











Add Comment